सिल्लोड, (प्रतिनिधी): तालुक्यातील चांदापूर येथील ग्रामपंचायत कार्यालय अनेक वेळा कुलूपबंद आढळून येत असल्याने नागरिकांची दैनंदिन कामे खोळंबत आहेत. दाखले, करभरणा, तक्रारी आदी कामांसाठी ग्रामपंचायतीत येणाऱ्या ग्रामस्थांना वारंवार परत जावे लागत असून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
याच ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरातच पायऱ्यांच्या खाली कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत आहेत. प्लास्टिक पिशव्या, कागद, खाद्यपदार्थांचे अवशेष यामुळे संपूर्ण परिसर विद्रूप झाला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत दरवर्षी स्वच्छतेचे गाजावाजा करणाऱ्या ग्रामपंचायतीत प्रत्यक्षात मात्र
ग्राम संसद चांदापुर कार्यालय स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. या अस्वच्छतेमुळे डास व दुर्गंधी वाढली असून गावाच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या विषयी ग्रामसेवक पवार यांना संपर्क केला असता, त्यांचा कुठल्याही मार्गाने संपर्क होऊ शकला नाही.
ग्रामपंचायत कार्यालय नियमित सुरू ठेवून नागरिकांची सर्व कामे वेळेत पूर्ण करून परिसरात साचलेला कचरा तातडीने साफ करून प्रभावी कचरा व्यवस्थापन राबवावे. ग्रामपंचायत समोरील बंद असलेले लाईट त्वरित दुरुस्त करावेत. गावातील मूलभूत सुविधांची कायमस्वरूपी व्यवस्था करून नागरिकांना दिलासा द्यावा.
- सुभाष थोरात, ग्रामस्थ चांदापूर















